चिपळूण : दिनांक : २४,०१.२०२५
रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम तीव्र करून त्यांना मदत करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा – हिंदु जनजागृती समितीची मागणी
रत्नागिरी, २४ जानेवारी (वार्ता.) रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. विशेष म्हणजे यापैकी काही जण कोणत्याही कागदपत्रांशिवाय, तर काही जण बनावट कागदपत्रांसह अनेक वर्ष जिल्ह्यात राहत असल्याचे धक्कादायक प्रकार उघड होत आहेत. यातील काही घुसखोरांना जामिन मिळाल्यामुळे जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम तीव्र करून त्यांना मदत करणाऱ्यांचर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीतर्फे आज चिपळूण येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
नुकतीच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात बांगलादेशी नागरीक असण्याची शक्यता असून त्यासाठी झोपडपट्टी भागात शोधमोहिम घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच गुन्हेगाराला मदत करणाऱ्यांना सहआरोपी करणार असल्याचे म्हटले आहे. पण केवळ सहआरोपी न करता त्यांच्यावर देशद्रोहाचे आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवली म्हणून कठोरात कठोर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.
१. चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे बांगलादेशी नागरिकांना अटक रत्नागिरीतील चिपळूण येथे ऑक्टोबर २०२३ मध्ये दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरी यांनी केलेल्या कारवाईत बुल्लू हुसैन मुल्ला या बांगलादेशी नागरिकाला त्याच्या २ मुलांसह अटक केली. मात्र त्याच्या परिवारातील इतरांना अटक केली नाही. गेली १२ वर्षे त्याची पत्नी आणि आणखी काही मुलांना घेऊन तो चिपळूण येथे रहात आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी नीट तपास केला नाही किंवा काय देवाण-घेवाण घडली, ज्यामुळे बुल्लू हुसैन मुल्ला व त्याच्या २ मुलांना जामीन मिळाला. देशात घुसखोरी करणाऱ्याला जामीन मिळतो, हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी जामीन रद्द होण्यासाठी काही केले नाही. जामिनदार मालेगाव येथील मोलमजुरी करणारा आहे, तो जामीन का राहिला? त्याचा बांगलादेशी नागरिकाशी काय संबंध आहे ? याप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे.
२. रत्नागिरीत १३ बांगलादेशी नागरिक अटक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरी तालुक्यातील नाखरे – कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. ते वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश करून चिरेखाणीवर काम करत होते.
३. इतकेच नव्हे, एका बांगलादेशी घुसखोराला रत्नागिरीजवळील शिरगाव येथे जन्म दाखला देण्यात आला होता.
४. नुकतेच रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे बांग्लादेशी नागरिक असलेली महिला मागील आठ वर्षापासून भारतात वास्तव्य करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या महिलेने भारतात वास्तव्य करत असताना आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे तयार केले असून विवाह देखील केल्याचे निष्पन्न झाले. तसेच या महिलेच्या नावावर शहरात मालमत्ता खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
५. अनधिकृतरित्या देशात प्रवेश करुन बांगलादेशी नागरिक बांधकाम क्षेत्र, मच्छीमारी तसेच रोजंदारीचे काम करत असू शकतात, तसेच झोपडपट्ट्यांमध्येही वास्तव्य करू शकतात.
रत्नागिरी जिल्हा, राज्य आणि देश यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवावी; या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुके, शहरे आणि गावे येथील संशयित ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ । ‘कोंम्बींग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे; बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी; भाड्याने खोली देण्याआधी घरमालकाने भाडेकरूंची, तसेच कामावर ठेवतांना कामगारांची योग्य ती चौकशी करावी, संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे; घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे.
सध्या बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. उद्या हेच बांगलादेशी घुसखोर वाढत जाऊन भारतात छोटे बांगलादेश निर्माण करून तेथील हिंदूंवर असेच अत्याचार करतील, ही परिस्थिती येऊ द्यायची नसेल, तर या प्रकरणी सरकारने आताच कठोर पावले उचलायला हवीत, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती करत आहे.यावेळी विनोद भुरण, भाजप जिल्हा सरचिटणीस, निहार कोवळे, तालुकाध्यक्ष युवा सेना, विक्रम जोशी, गोरक्षक,अभिनव भुरण हिंदुत्वनिष्ठ,अमित जोशी संयोजक हिंदू राष्ट्र समन्वय समिती पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.