निवडणूका पक्षाच्या विचारधारेपेक्षा पैशाच्या जोरावर लढविल्या जात आहेत, हे चिंताजनक असुन लोकशाहीला मारक आहे.
माजी आमदार सुभाष बने यांची खंत – निवडणूका पक्षाच्या विचारधारेपेक्षा पैशाच्या जोरावर लढविल्या जात आहेत, हे चिंताजनक असुन लोकशाहीला मारक आहे. अशी खंत उबाठा शिवसेनेचे नेते माजी आमदार सुभाष बने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
पदाचा व सत्तेचा दुरुपयोग करत जनहिताकडे कानाडोळा करून पैसा लुटायचा व तो पैसा निवडणूकीच्या काळात वारेमाप उधळवत निवडणूक जिंकण्यासाठी वापरून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे सुत्रच झाले आहे..! पण यावेळेस हे तंत्र जागृत मतदार राजाच उधळून लावत सत्तेचा माज आलेल्यांची धुळदाण करत घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
करोडो रुपयांची विकासकामे झाली असल्याचे दावे-प्रतिदावे करणाऱ्यांनी जनतेच्या मुलभूत गरजा कीती पुर्ण झाल्या व आपण व आपल्या बगलबच्यांनी आलेल्या निधीवर कीती डल्ला मारला..? तसेच विकासाच्या आकडेवारीत किती सत्यता आहे, ते तपासून याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही बने यांनी विरोधकांना दिला.
पाच वर्षाच्या काळात दिलेल्या आश्वासनाकडे पाठ फिरवून विकासाच्या नावाखालील निधी हडपुन पुन्हा निवडणुकीला उभे रहायचे हे षडयंत्र यावेळी सुज्ञ झालेला मतदार राजा धुळीस मिळवित योग्य तो जनकौल देईल, असा आशावाद व्यक्त केला
चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात विचारधारेशी काडीमोड घेऊन पक्षफोडीत सहभागी झालेल्या नेतृत्वापेक्षा स्वच्छ, निर्मळ, अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव हे निवडून येत जनतेचा विश्वास सार्थ ठरवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हातील सर्व मतदारसंघातील मतदार हे शिक्षीत, जिज्ञासू सांस्कृतिक रुढी-परंपरा वारसा जपणारे आहेत. त्यामुळे कुठल्याही अमिषाला वा दहशतीला ते बळी पडणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवारच विजयी होतील असा आशावाद शेवटी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांना सोबत घेत पक्ष नेतृत्वाचा आदेश पाळत चिपळूण संगमेश्वर मतदार संघात आघाडी धर्म पाळत जोरदार तुतारी फुंकून प्रशांत यादव हे विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.