दिपक शिंदे चिपळूण : चिपळूण पोलिसांनी शहरातील एकावरआचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील फेसबूक अकाऊंटवर आचारसंहिता भंग होणारी पोस्ट केल्याप्रकरणी सुनील जनार्दन बक्षी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिस नाईक शंकर ठोंबरे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ठोंबरे हे चिपळूण पोलिस ठाण्यात गोपनीय विभागात काम करीत असताना सोशल मीडियावर ते लक्ष ठेवून होते. राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आचारसंहिताही लागली आहे. त्या अनुषंगाने काम करीत असताना सुनील बक्षी यांच्या नावे असलेले फेसबुक अकाऊंटवर २१ ऑक्टोबर रोजी एक पोस्ट शेअर केलेली दिसून आली. ‘मविआला मत म्हणजे आतंकी, देशाची सुरक्षितता धोक्यात आणणे, मविआच्या विरोधात मते द्या, जो राहुल गांधींच्या बाजूने तो आपला वैरी’ अशा आशयाचा हा मजकूर होता. ही पोस्ट तुलसी अपार्टमेंटमधील बक्षी यांनी टाकल्याचे समजल्यावर पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी आचारसंहिता भंगाची तक्रार असल्याचे लक्षातघेऊन तत्काळ तक्रार नोंदविण्याचे आदेश दिले.