DEEPAK SHINDE 9970406816
कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना ‘सहकार भूषण’ पुरस्कार प्रदान
चिपळूण (प्रतिनिधी):– कोकण मराठी पत्रकार संस्थेच्या प्रथम वर्धापन दिन सोहळा प्रसंगी गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या हस्ते चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना ‘सहकार भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराने चिपळूण नागरीच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा पुरवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल सुभाषराव चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्काराचा कार्यक्रम खेड- भरणे येथील गणेश मंगल सभागृहात पार पडला.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे. आर्थिक व्यवसायिकता सांभाळीत असतानाच गरजू, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो. इतकेच नव्हे तर ठेवींवर देखील योग्य व्याज दर दिला जात आहे. तर सामाजिक बांधिलकी देखील तितकीच जपली जात आहे.
चिपळूण नागरीच्या ५० शाखांच्या माध्यमातून आर्थिक व्यावसायिकता संभाळताना- पारदर्शक कारभारदेखील केला जात आहे. तसेच चिपळूण नागरीने सभासदांना बचतीची सवय लागावी यासाठी अनेक योजना सुरू केले आहेत. यामध्ये धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव, राष्ट्र अमृत महोत्सव ठेव, संकल्प ठेव, श्रावण मास ठेव, समृद्धी ठेव, गणेश ठेव, उत्कर्ष व धनसंचय ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त, बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धनी, दाम दुप्पट, दाम तिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत. एकंदरीत चिपळूण नागरीची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
या यशस्वी वाटचालीबद्दल कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना ‘सहकार भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार नुकताच कोकण मराठी पत्रकार संस्थेच्या प्रथम वर्धापनदिनी खेड येथील आयोजित कार्यक्रमात गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर हे होते. तर यावेळी कोकण मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष संतोष बाणे, प्रमुख कार्यवाह दिलीप देवळेकर, दिलीप शेट्ये आदी उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, चिपळूण नगरीने स्थापनेपासूनच सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे गरजूंना सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा ठेवींवर योग्य व्याजदर यामुळे चिपळूण नागरीची अखंडितपणे यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. चिपळूण नागरीने आर्थिक पारदर्शकता सांभाळत सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. यामुळे चिपळूण नागरीला यापूर्वी देखील अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता पुन्हा एकदा संस्थेला पुरस्कार जाहीर झाला असून संस्थेच्या शिरपेचात मानाचा पुन्हा एकदा तुरा रोवला गेला आहे. यामुळे संस्थेची जबाबदारी आणखी वाढली आहे. ही जबाबदारी नक्कीच प्रामाणिकपणे पार पाडू, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला आहे.
चिपळूण नागरीची यशस्वी वाटचाल संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सभासद, हितचिंतकांच्या सहकार्याने सुरू आहे. या पुरस्काराबद्दल सुभाषराव चव्हाण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.